उपचारानंतर घरी जाणार्‍या युवकावर काळाचा घाला !

Foto

औरंगाबाद : येथील घाटी रुग्णालयात मुलावर उपचार करून गावाकडे परत जात असताना दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला तर वडील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी पिशोर जवळील भालेगाव-डोंगरगाव येथे घडली. 

अर्जुन संजय मनगटे (वय 12 वर्षे) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे, तर त्याचे वडील संजय मनगटे (वय 14 वर्षे, रा. लोहगाव ता. कन्‍नड) हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनला नाकाचा आजार झाला आहे. त्या आजारावर उपचार करण्यासाठी त्याचे वडील संजय मनगटे यांनी सोमवारी सकाळी दुचाकीवरून अर्जुनला येथील घाटी रुग्णालयात आणले होते. उपचार करून अर्जुन व संजय मनगटे हे पिता-पुत्र दुचाकीवरून लोहगावच्या दिशेने निघाले होते. गावाकडे परत जात असताना भालेगाव-डोंगरगाव परिसरातील लालबरडी वस्तीजवळ दुचाकीवरील संजय मनगटे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. दुचाकी घसरत गेल्यामुळे दोघेही पुलाखाली गेले. अर्जुनच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्‍तस्त्राव होऊन रुग्णालयात दाखल करताच त्याचा मृत्यू झाला.